मनोज जरांगे पाटलांनी फोडला ऑडिओ बॉम्ब!! कथित ५०० कोटींच्या आरोपाचे दिले पुरावे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रात मोठी खळबळ

Foto
जालना :  बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला, बीडमधील नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले, अशी चर्चा भाजप नेत्यांमध्ये आहे, त्याबाबत आजच्या मेळाव्यातून उत्तर द्या, असा सवाल जरांगे पाटलांनी विचारला. त्यानंतर आता या प्रकरणी आज मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत पुरावे दाखवतो असं म्हणत एक ऑडीओ क्लिप ऐकवली आहे.
 
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सलग तीन वर्षापासून आजपर्यंत सारखं माझ्या विरोधात षड्यंत्र सुरू आहे. हे षडयंत्र माझ्या मायबाप समाजापुढे जायला पाहिजे. हे किती मोठे हे प्रकरण आहे, मी किती वेदना सहन करत आलो आहे, हे मराठा समाजापुढे गेलं पाहिजे. मराठ्यांचं आंदोलन अन्याय करून बंद पडायचं, जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा. कसे षडयंत्र रचले जात आहे,  हे मराठा समाजापुढे येणार आहे, निवडणुकीच्या काळामध्ये, उपोषणाच्या काळात देखील षडयंत्र झाले. आंदोलनाच्या काळात ही षडयंत्र झाले आहे, किती मोठे डाव रचले जात आहेत. हे यातून कळत आहे, राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे, माझ्यासोबत दुष्मणासारखे वागत आहेत. एवढ्या भयंकर स्वरूपाचे षडयंत्र का रचले जाते आहे, याचा शोध पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असंही पुढे मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
निरंजन डावखरे, दरेकर यांच्या नावांचा उल्लेख..

यावेळी मनोज जरांगे यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे, यामध्ये निरंजन डावखरे, दरेकर यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, पक्षातून (भाजप) कोणी बोलायला तयार नाही असा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. शरद पवार पैसे देत आहेत असा फक्त उल्लेख यामध्ये आहे. कॉन्फरन्स मधील ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे, तर या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक गोष्टींवरती भाष्य केल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात जरांगेंच्या विरोधात बोलायला लोक तयार आहेत, त्याला (जरांगेंना) आवरलं नाही तर मराठवाड्यात तुम्हाला गिळून टाकेल, त्याला डॅमेज करायचा प्रयत्न सुरू करायला हवा, असंही या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणार्‍या दोन व्यक्तीच्या संभाषणातून दिसून येत आहे.

जरांगे पाटील यांना ऑलरेडी ५०० कोटी रुपये पोहोचले...
पुढे एका ऑडिओ क्लिपमध्ये महिलांचं संभाषण दिसून येतं, त्याच एक महिला सांगते, जरांगे पाटील यांना ऑलरेडी ५०० कोटी रुपये पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेमार्फत हे पैसे दिले आहेत. आता जरांगे पाटील विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील नाही राहणार याबाबतचं माझं मत वेगळं आहे. कॅलक्यूलेशन वेगळं आहे. बाकी तुम्ही जो विचार करत आहात, त्याचबरोबर जरांगे पर्सनल फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे, जरांगे यांना भाजपचे नेते मदत करत असल्याचा उल्लेख देखील यामध्ये आहे, फडणवीस यांना बदनाम करण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. संभाजीनगरमधील लव्ह जिहाद प्रकरणाचा उल्लेख त्याचबरोबर या प्रकरणाचा कोणी निषेध केला नसल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. व्होट जिहादचे राजकारण, मराठा समाजाचे ओबीसीकरण या दोन विषयाला घेऊन वेगवेगळ्या लोकांनी येऊन कॅम्पेन केले पाहिजे. त्यामुळे वातावरण ढवळून निघेल, असा उल्लेख क्लिपमध्ये आहे. तर क्लिपमध्ये पुढे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा राजकारणाचा, लेखाचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अमेरिकेचे लोक महाराष्ट्रात फिरत असल्याचा बांगलादेश करत असल्याचा प्रचार करण्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

हे लोक कोण आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे यांनी शोधावे...
या ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर पुढे मनोज जरांगेंनी म्हटलं की, हे लोक कोण आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे यांनी शोधावे, सत्तेत तुम्ही आहेत शोधण्याचे काम तुमचे आहे. आम्ही सत्य जनते समोर ठेवले आहे. हे पक्षाचे नेटवर्क ठरवणारे, हे लोक देशाची आणि राज्याची रणनीती ठरवणारे लोक आहेत, एवढे षडयंत्र म्हटल्यावर आम्ही घराबाहेर कसे पडायचे, ३ वर्षापासून हे षडयंत्र सुरू आहे. तुमच्यापुढे सत्य मांडण्यासाठी ते उद्या आम्हाला मारून टाकतील, आम्ही सावध राहू, श्रीकांत भैय्याने ५०० करोड दिले उल्लेख आहे. हे शिंदे साहेब म्हटल्याशिवाय ते बोलले का? फडणवीस साहेब तुम्ही शोधले नाही तर यात तुमचा हात आहे असे समजू, या लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेपर्यंत न्या. मोदी साहेबांनी याचा छडा लावावा. मराठ्यांनी डोळे उघडा, निरंजन डावखरे मध्येच आला कोण आहे काय माहिती? भाजपचा पार्टी फंड वापरा असं त्यात सांगतात, माझ्या विरोधात भाजपचा फंड वापरत आहेत, माझ्या विरोधातील लोकांसाठी पार्टी फंड वापरत आहेत, असंही पुढे मनोज जरांगे म्हणालेत.

मी खोलात गेलो तर माझ्याकडे भयंकर गोष्टी आहेत....
माझ्याकडे आणखी काही माहिती आहे. तुमचे पाय सुद्धा जमिनीवर थांबणार नाहीत. शिंदे साहेब तुम्ही कोणाविरोधात व्हाट्सअप कॉल वर बोललात. ते सुद्धा माहिती, शिंदे साहेब माझ्या विरोधात तुमची लोक बोलणे बंद करा, नाहीतर २- ३ महिन्यांनी आणखी एक काढणार, शिंदे साहेब तुमचा स्वाभिमान होता, तुम्ही माझ्या विरोधात टीम फिरवू नका. तुमचा कोणता मंत्री काय पुरवतो हे मला माहिती आहे. आमच्यावर खोटे गुन्हे कसे होतात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, बीडमध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत. शिंदे साहेब तुम्ही सावध व्हा. फडणवीस साहेब मी खोलात गेलो तर माझ्याकडे भयंकर गोष्टी आहेत. तुम्ही थांबले नाही तर मी सगळे उघडे करणार, शिंदे साहेब हाताखाली धरलेल्या लोकांमुळे तुमचे करिअर उध्वस्त होईल. हे मी सरनाईक, उदय सामंत, चिवटे, सत्तार, सुहास कांदे, दादा भुसे केसरकर यांना सांगितले आहे. तुमचे करिअर धोक्यात येतील, नारायण गडाचा निधी कोणी रोखला हे मला माहिती आहे, असंही पुढे मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.